नवी दिल्ली
देशातील सर्वात लोकप्रिय पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड असलेल्या बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हणजेच एफएसएसएआयने बिसलेरीच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे नमुने असुरक्षित आढळल्याने कंपनीविरुद्ध कायदेशीर खटला दाखल करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. प्रवासात किंवा बाहेर असताना शुद्ध पाण्याची खात्री म्हणून कोट्यवधी नागरिक ज्या बाटलीबंद पाण्यावर विश्वास ठेवतात, त्याच कंपनीचे पाणी मानकांवर खरे न उतरल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नियामकाने हे कठोर पाऊल उचलले आहे.
अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित तपासणीचा भाग म्हणून बिसलेरी इंटरनॅशनलच्या आवारातून पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्राथमिक प्रयोगशाळा विश्लेषणात या पाण्यामध्ये ब्रोमेटचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. ब्रोमेट हा घटक मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जात असल्याने हे पाणी पिण्यासाठी असुरक्षित घोषित करण्यात आले. या प्राथमिक अहवालानंतर बिसलेरी कंपनीने नियमांनुसार अपील केले होते. कंपनीच्या विनंतीवरून हे नमुने पुढील सखोल तपासणीसाठी रेफरल फूड लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले. मात्र, या दुसऱ्या तपासणीतही कंपनीला कोणताही दिलासा मिळाला नाही. रेफरल प्रयोगशाळेच्या अहवालात या पाण्यामध्ये पॉलीन्यूक्लियर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजेच पीएएच या घातक रसायनांचे अस्तित्व आढळून आले, ज्यामुळे हे पाणी मानवी सेवनासाठी पूर्णपणे असुरक्षित असल्याचा शिक्कामोर्तब झाला.
दोन्ही प्रयोगशाळांचे अहवाल विरोधात गेल्यानंतर एफएसएसएआयने कंपनीवर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. या वर्षभरात अन्न सुरक्षा प्राधिकरणाने अन्न व्यावसायिक, ई-कॉमर्स कंपन्या, एनर्जी ड्रिंक्स आणि पेय निर्मात्यांविरुद्ध आपली तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. जानेवारी २०२६ पासून उत्पादकांसाठी अनिवार्य चाचणी योजना लागू करण्यात आली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही मोठ्या ब्रँडची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

0 टिप्पण्या