कोंबड्यांना ६ महिन्यांचे संरक्षण
नवी दिल्ली
कुक्कुटपालन व्यवसायातील कोंबड्यांना बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लूएंझा या घातक आजारापासून वाचवण्यासाठी भोपाळमधील शास्त्रज्ञांनी भारतातील पहिली स्वदेशी लस तयार केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते शुक्रवारी भोपाळमध्ये या महत्त्वपूर्ण लसीचे लोकार्पण पार पडले. भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान (निह्साद) मधील संशोधकांनी बर्ड फ्लूला कारणीभूत ठरणाऱ्या एच५एन१ (H5N1) विषाणूचा मुकाबला करण्यासाठी ही प्रभावी लस विकसित केली आहे. या लसीकरणामुळे कोंबड्यांना पुढील सहा महिन्यांपर्यंत रोगप्रतिकारक कवच मिळणार आहे. संशोधकांच्या अंदाजानुसार, या लसीच्या एका डोसची किंमत केवळ एक ते दोन रुपयांच्या दरम्यान असेल.
या स्वदेशी लसीच्या निर्मितीचे काम सप्टेंबर २०२५ पासून हाती घेण्यात आले होते. भोपाळच्या आयसीएआर-निह्साद संस्थेचे संचालक डॉ. अनिकेत सान्याल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. नागराजन यांच्या नेतृत्वात आठ संशोधकांच्या टीमने ही लस यशस्वीरीत्या तयार केली आहे. आयसीएआरचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांनी स्पष्ट केले की, एच५एन१ विषाणूच्या अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या 'क्लेड २.३.२.१ए' (clade 2.3.2.1a) या प्रकारावर मात करणारी ही जगातील पहिलीच लस ठरली आहे. या लोकार्पण सोहळ्यात लस निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या आठही शास्त्रज्ञांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ही स्वदेशी लस लवकरात लवकर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी बाजारात उपलब्ध करून द्यावी, असे आदेश कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच निह्साद संस्थेमध्ये आगामी काळात ३०० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक बीएस-४ (BS-4) प्रयोगशाळा उभारली जाईल, अशी मोठी घोषणाही त्यांनी यावेळी केली. या स्वदेशी लसीच्या आगमनामुळे पोल्ट्री उद्योगातील संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार आहे. यापूर्वी बर्ड फ्लूची साथ आल्यास संपूर्ण कोंबड्या नष्ट करण्याशिवाय पर्याय नसायचा, परंतु आता या स्वदेशी लसीमुळे कुक्कुटपालकांना मोठा आधार मिळणार आहे.

0 टिप्पण्या