दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

४२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पुढील ३ महिने मोफत धान्य मिळणार


मुंबई

राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाने मोठा दिलासा दिला आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ३३ जिल्ह्यांतील (मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे वगळून) अशा शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, जे अद्याप राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही अन्नधान्य योजनेच्या कक्षेत येत नाहीत. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यभरातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकरी कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे.

सध्या महाराष्ट्रात ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्य दिले जाते, तर आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रुपये रोख मदत दिली जाते. या दोन्ही योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबांचा विचार करून मंत्रिमंडळाने त्यांना प्रति व्यक्ती दरमहा ५ किलोग्राम मोफत धान्य देण्याचे निश्चित केले आहे. हे धान्य वाटप पुढील तीन महिन्यांसाठी सुरू राहणार असून, यामध्ये प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ आणि २ किलो गव्हाचा समावेश असेल. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सरकार परिस्थितीचा आढावा घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय घेईल. ज्या रेशन कार्डधारकांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे, त्यांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून त्वरित धान्य वितरित केले जाईल, तर उर्वरित लाभार्थ्यांना आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण होताच बायोमेट्रिक पडताळणीद्वारे धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या मोफत धान्य वाटपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे करण्याच्या प्रस्तावालाही राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासोबतच, राज्यातील नागरिकांना सरकारी सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि विहित वेळेत मिळाव्यात या उद्देशाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५' मधील महत्त्वपूर्ण सुधारणांनाही फडणवीस मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १० कोटी रुपयांची मदत दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या