९० टक्के कर्ज, १० टक्के अनुदान; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा!
मुंबई
शेतीतील अनिश्चितता, दुष्काळ आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी राज्य सरकारने रिक्षा वाटपाची योजना जाहीर केली आहे. पुढील पाच वर्षांत तब्बल एक लाख प्रवासी रिक्षांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘अनाथांचा नाथ... दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ जाहीर केली आहे. परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. २०२७ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत एक लाख रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या वर्षी २० हजार पात्र शेतकरी कुटुंबांना रिक्षा देण्याचे नियोजन आहे. राज्यातील ३१० हून अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांतील लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश असेल. रिक्षा खरेदीसाठी एकूण किमतीच्या ९० टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळणार आहे. उर्वरित १० टक्के रक्कम कल्याणकारी मंडळाकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची रिक्षा घेऊन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेसाठी जाहिरात प्रसिद्ध करून पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जाणार आहेत. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर संगणकीय लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्यांचे प्रस्ताव कर्जमंजुरीसाठी बँकांकडे पाठवले जातील.
कोणाला मिळणार लाभ?
- दुष्काळग्रस्त तालुक्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबे.
- शेतीचा पुरावा आवश्यक.
- यापूर्वी समान स्वरूपाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- वाहन चालविण्याचा वैध परवाना किंवा तो मिळवण्याची पात्रता आवश्यक.
- बँकेच्या कर्जमंजुरीच्या अटी पूर्ण करणे बंधनकारक.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ फेब्रुवारी २०२७ रोजी पात्र लाभार्थ्यांना रिक्षांच्या चाव्या देण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मिळालेली रिक्षा संबंधित लाभार्थ्याला त्याच जिल्ह्यात वापरता येणार आहे.
शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?
या योजनेच्या अर्ज प्रक्रियेची अधिकृत जाहिरात आणि अंतिम नियमावली प्रसिद्ध झाल्यानंतरच अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे सध्या कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका. अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवा.

0 टिप्पण्या