व्हिडिओ व्हायरल होताच पर्यटकांमध्ये खळबळ, राजकारणही तापले
आग्रा
आग्रा येथील ताजमहाल परिसरात माकडांची मोठी टोळी शिरल्यामुळे पर्यटकांमध्ये घबराट उडाली आहे. ताजमहालच्या आवारात शेकडो माकडे एकत्र आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या व्हिडिओत माकडांचा कळप मोकळेपणाने फिरताना दिसत असून, अचानक समोर आलेल्या माकडांमुळे देशी-विदेशी पर्यटकांत भीतीचे वातावरण पसरले. काही पर्यटक जागेवरच थांबले, तर काहींनी बचावासाठी आपली वाट बदलली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, माकडे आवाज करत पर्यटकांच्या जवळून जात असल्याने अनेकांना अस्वस्थता आणि त्रास सहन करावा लागला.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत भाजप सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या काळात जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या वास्तूची अशी स्थिती पाहून वाईट वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारांमुळे पर्यटनाला फटका बसल्यास राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट एक बिलियनवर येण्यास वेळ लागणार नाही आणि अयोग्य हाती सत्ता गेल्यानेच ही अवस्था झाल्याची टिप्पणी त्यांनी केली.
आग्रा येथील ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. मुघल सम्राट शाहजहानने मुमताज महल यांच्या स्मरणार्थ १६३२ मध्ये या वास्तूचे काम सुरू केले आणि सुमारे बावीस वर्षांनंतर १६५३ मध्ये हा परिसर पूर्ण झाला. अशा ऐतिहासिक वास्तूच्या परिसरातील माकडांचा वावर आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

0 टिप्पण्या