उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रोटोकॉलच्या मोठ्या चुकीमुळे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शनिवारी सहारनपूर येथील सर्किट हाऊसवर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या स्वागतासाठी तैनात असलेल्या पोलीस पथकाने चुकून एआयएमआयएम (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना 'गार्ड ऑफ ऑनर' म्हणजेच शासकीय मानवंदना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार असदुद्दीन ओवैसी हे आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांची भेट घेण्यासाठी सहारनपूर दौऱ्यावर आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्किट हाऊसवर पोहोचण्यापूर्वीच ओवैसी यांचा वाहनांचा ताफा आणि सुरक्षा रक्षक तिथे दाखल झाले. वाहनांचा ताफा पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी ओवैसी हेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असल्याचे समजून त्यांना रीतसर शासकीय सलामी दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी सूचित केल्यानुसार खासदार ओवैसी हे देखील तिथे उभे राहिले आणि त्यांनी ही मानवंदना स्वीकारून पुढील प्रवासासाठी रवाना झाले. काही वेळातच खऱ्या न्यायमूर्तींचे आगमन झाल्यावर आपली मोठी चूक झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सहारनपूरचे शहर पोलीस अधीक्षक व्योम बिंदल यांनी या प्रोटोकॉल चुकीची कबुली देत हा प्रकार पूर्णपणे अनावधानाने घडल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

0 टिप्पण्या