कच्छ
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज-खावडा महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक अत्यंत हृदयद्रावक रस्ता अपघात घडला असून, यामध्ये भारतीय लष्करातील दोन कार्यरत जवानांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन्ही जवानांच्या पत्नी आणि तीन लहान मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील दोन कुटुंबांतील सदस्य होते आणि संबंधित दोन्ही जवान भुज येथे कर्तव्यावर तैनात होते. शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हे दोन कुटुंबीय ह्युंदाई ऑरा कारमधून खावडा येथून भुजच्या दिशेने प्रवास करत होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने म्हणजेच भुजकडून खावडाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रेलर ट्रकने त्यांच्या कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन तिचे दोन तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर कारमधील सर्व सात जणांना मृत घोषित केले. कच्छ पश्चिमचे पोलीस अधीक्षक विकास सुंडा यांनी रविवारी या दुर्दैवी घटनेला दुजोरा दिला असून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात मोदींनी शोकसंवेदना व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना केली आणि पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली.

0 टिप्पण्या