परिसीमन विधेयकावर सुप्रिया सुले यांचे मोठे विधान
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुले महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. सरकारने सर्वप्रथम हे विधेयक संसदेत सादर करावे आणि त्याचा संपूर्ण मसुदा खासदारांसमोर आणावा, जेणेकरून सर्व सदस्यांना त्यातील तरतुदी नीट समजून घेता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विधेयकाचा मसुदा हातात आल्यानंतरच त्यावर सखोल चर्चा करणे योग्य ठरेल आणि हे विधेयक चांगलेही ठरू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन कायदे संमत केल्याची अनेक उदाहरणे देशात आहेत, त्यामुळे कोणत्याही विधेयकावर निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या तरतुदी समजून घेणे आवश्यक असल्याचे सुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, यापूर्वी भाजप खासदार कंगना रनौत यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी हे महिलाविरोधी असल्याचा आरोप करत त्यांनी संसदेत महिलांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने जावी असे त्यांना वाटत नसल्याचे म्हटले होते. जर राहुल गांधी महिलाविरोधी नसते, तर त्यांनी हे विधेयक सादर होऊ दिले असते, असा दावा कंगना यांनी एएनआयशी बोलताना केला होता.
सध्या देशभरात महिला आरक्षण आणि प्रस्तावित परिसीमन प्रक्रियेवरून राजकीय वादंग सुरू आहे. महिला आरक्षण कायद्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे; मात्र त्याची अंमलबजावणी जनगणना आणि त्यानंतर होणाऱ्या परिसीमन प्रक्रियेशी जोडण्यात आली आहे. लोकसभेच्या एकूण जागांची संख्या वाढवून ८५० करणे हा प्रस्तावित परिसीमन विधेयकाचा उद्देश आहे. नवीन जनगणनेच्या आकडेवारीनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करणे आणि महिला आरक्षण लागू करणे यासाठी ही घटनात्मक गरज असल्याचे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) म्हणणे आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी इंडिया आघाडीने विद्यमान ५४३ सदस्यीय लोकसभेतच महिला आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. महिला आरक्षणाला परिसीमन प्रक्रियेशी जोडण्याला विरोधकांचा आक्षेप आहे. १६ एप्रिल रोजी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या संविधान (१३१ वा सुधारणा) विधेयकाद्वारे लोकसभेची सदस्य संख्या ८५० करण्याचा आणि महिला आरक्षण कायदा लवकर लागू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, सभागृहात उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन-तृतीयांश विशेष बहुमताचा पाठिंबा न मिळाल्याने हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.

0 टिप्पण्या