राहुल गांधींचा फोटो आणि नाव वापरताच पोस्ट होतायत ब्लॉक

युवक काँग्रेसची मेटा विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव


नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो आणि नाव असलेल्या पोस्ट सोशल मीडियावर आपोआप ब्लॉक केल्या जात असल्याचा आरोप करत भारतीय युवक काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि सोशल मीडिया विभाग प्रमुख मनु जैन यांनी मेटा प्लॅटफॉर्म्सविरोधात ही कायदेशीर लढाई सुरू केली आहे. केवळ राहुल गांधींचे नाव किंवा प्रतिमा की-वर्ड म्हणून वापरून कार्यकर्त्यांच्या पोस्ट रोखल्या जात असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

संघटनेचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट हाताळणाऱ्या मनु जैन यांनी २९ सप्टेंबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांना आलेल्या नोटिसांचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. या नोटिसांद्वारे संबंधित पोस्ट भारतात दिसणार नसल्याचे कळवण्यात आले होते. विशेष म्हणजे ब्लॉक झालेल्या पोस्टमध्ये लग्नपत्रिका, कार्यकर्त्यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन, माजी पंतप्रधानांना केलेले अभिवादन, राहुल गांधींसोबतचे फोटो तसेच शिकागो विद्यापीठातील भाषणाचा संदर्भ अशा विविध आशयाचा समावेश होता. या सर्व पोस्टमध्ये राहुल गांधींचे नाव किंवा फोटो असणे हाच एकमेव समान धागा होता.

या कारवाईपूर्वी मेटाकडून कोणतीही पूर्वसूचना, अधिकृत आदेश किंवा कारण देण्यात आले नसल्याचे जैन यांनी म्हटले आहे. अनेक महिन्यांपूर्वी टाकलेल्या पोस्ट अचानक ब्लॉक करणे आणि शिकागो विद्यापीठाच्या भाषणाची पोस्ट ब्लॉक केल्यानंतर त्याच दिवशी पुन्हा सुरू करणे, हा प्रकार संशयास्पद असल्याचे याचिकेत म्हटले आहे. ही कृती केंद्र सरकारच्या कायदेशीर अधिकारक्षेत्राबाहेरील असून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या आदेशानुसार आणि नेमक्या कोणत्या की-वर्डच्या आधारे या पोस्ट ब्लॉक केल्या गेल्या, याचे स्पष्टीकरण केंद्र सरकार व मेटाने द्यावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या